मुंबई : विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. माजी सदस्य भरतभाऊ नारायणभाऊ बहेकर, बाबुराव काशिनाथ पाचर्णे, जनार्दन दत्तुआप्पा बोंद्रे, नानासाहेब शांताराम माने, रावसाहेब पांडुरंग हाडोळे, उद्धवराव अंताराम शिंगाडे यांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विधानसभेत राष्ट्रगीताने कामकाजास सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.
तसेच अधिवेशन कालावधीतील विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तालिका अध्यक्षपदी सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे, शिरीष चौधरी यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली.