Sanjay Raut | Amit Shah । महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. जागावाटपावरून उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गट ‘प्लॅन बी’ वर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्व 288 जागांसाठी तयारी करत आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये जागावाटप झाले नाही तर ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवू शकतात.
अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे काँग्रेसपासून दूर गेले तर ते भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, दुसरीकडे संजय राऊतांची अमित शाहांशी भेट झाली हे सांगितलं जातय.
मात्र, यावर आता स्वतः खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “संजय राऊतांची अमित शाहांशी भेट झाली हे सांगितलं जातय, ही हास्यास्पद गोष्ट आहे.
काँग्रेस नेते असे दावे करत असतील तर त्यांचंही आश्चर्य वाटत आहे. शिवसेनेने फक्त संघर्ष केलेला नाही, तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं. आमचं चिन्ह त्यांनी चोरलं.
त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं”, असं संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “स्वतच्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोंडे उडवणार हे लोक आहेत. जर अशा अफवा पसरवून लढणार असतील तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. या सुपाऱ्या देणाऱ्यांची वित्तंबातमी आमच्याकडे आहे.
आमचीही यंत्रणा आहे. एक वेगळं पेगॅसस आमच्याकडे आहे. कोण कोणाला बातम्या पुरवतं. अफवा पसवण्यात मदत करतो ही सगळी माहिती आमच्याकडे आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.