मुंबई – विधानसभा निवडणुकीचा प्रचार हळूहळू आता जोर धरू लागला आहे. पण यावेळी पक्षाने उमेदवारी न दिल्याने अनेकांनी बंडखोरी केली आहे. यात बंडखोरी केलेल्या पाच नेत्यांची कॉंग्रेस पक्षाने हकालपट्टी केली आहे. काँग्रेसने सहा वर्षांसाठी बंडखोरांना पक्षातून निलंबन केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी माहिती दिली आहे.
यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्या जयश्री पाटलांना आता खासदार विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला. आता जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
चेन्नीथला म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच गॅरंटी आम्ही काल जाहीर केल्या आहेत. भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी या गॅरंटी महत्त्वाच्या आहेत. 13,16 आणि 17 नोव्हेंबरला प्रियंका गांधी महाराष्ट्रात येत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे पाच दिवस महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. ज्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
आम्ही गॅरंटी दिलेल्या आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मुंबईत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.