नाशिक – Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्व पक्षीय नेत्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर अनेक ठिकाणी बंडखोरी पहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही बंडखोरी झाली आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रंजन ठाकरे हे अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.
महायुतीने भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांना उमेदवारी घोषित केली असताना रंजन ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर रंजन ठाकरेंच्या उमेदवारीने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच रंजन ठाकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत –
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गिते (Vasant Gite) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता रंजन ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
समीर भुजबळ यांचीही बंडखोरी –
काही दिवसांपूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यासमोर समीर भुजबळ यांनी आव्हान निर्माण केले. यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.