छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय पक्षांकडून अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी भाजप नेत्यांच्या ‘व्होट जिहाद’ टीकेवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या अरब देशांच्या दौऱ्यावेळीही हीच भाषा बोलतात का, असा सवाल केला.
भाजपने मुख्य मुद्द्यांवरून लक्ष वळवल्याचा आरोप –
हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी सत्ताधारी पक्षावर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांसारख्या मुख्य मुद्द्यांवरून लक्ष वळवल्याचा आरोप केला. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद मध्य मतदारसंघातील (Aurangabad Central Assembly constituency) मतदारांशी ओवेसी यांनी घरोघरी जाऊन संवाद साधला. AIMIM ने नसीर सिद्दीकी यांना या मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे केले आहे. त्यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल आणि शिवसेनेचे (UBT) बाळासाहेब थोरात यांच्याशी होत आहे.
‘औरंगाबाद विभागात 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ –
एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांनी प्रश्न केला की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात ‘व्होट जिहाद’बद्दल बोलत आहेत. पण पंतप्रधान (नरेंद्र मोदी) अरब देशांच्या दौऱ्यावर जातात तेव्हाही ते हीच भाषा बोलतात का? ओवेसी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात 324 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र त्यावर कोणी बोलत नाही. त्याऐवजी फडणवीसांना ‘व्होट जिहाद’ आठवत आहे. ते फक्त एकाच समुदायाला लक्ष्य करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात ते का कमी पडले याचे उत्तर त्यांनी द्यावे.
मराठा, मुस्लिम आणि दलितांना एकत्र राहण्याचे आवाहन –
यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी मराठा, मुस्लिम आणि दलितांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता मराठा, मुस्लिम आणि दलितांनी एकत्र राहून एकोप्याने राहणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. औरंगाबाद मध्य मतदारसंघ हा राज्यातील मराठवाडा विभागाचा एक भाग आहे, जिथे मराठा कार्यकर्ते मनोज जरंगे हे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील काही एनजीओ ‘व्होट जिहाद’ला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता ओवेसी म्हणाले की, कोणीही कायद्याचे पालन करून प्रचार करू शकतो. यात ‘जिहाद’ कुठून आला, असा सवाल त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान काय –
काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडी (एमव्हीए) या विरोधी गटावर निशाणा साधत फडणवीस यांनी यापूर्वी दावा केला होता की, ‘लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 14 मतदारसंघात ‘वोट जिहाद’ पहायला मिळाला. ते म्हणाले होते, ‘धुळे मतदारसंघात पाच विधानसभा जागांवर भाजपच्या उमेदवाराने 1.9 लाख मतांनी आघाडी घेतली, मात्र मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानामुळे आमच्या उमेदवाराचा अवघ्या 4 हजार मतांनी पराभव झाला’.