Devendra Fadnavis | Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ठरला आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपकडेच मुख्यमंत्रिपद जाणार हे आता निश्चित झाले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. भाजपमधून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव अंतिम झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भात 2 डिसेंबर रोजी भाजपची बैठक असून त्यामध्ये गटनेता निवडला जाणार आहे. तर, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहे.
यासह अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएतील घटक पक्षांचे नेते आणि संत, महंत आणि धर्मगुरू देखील उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. तर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरूण आमदारांचाही समावेश आहे.