BJP | Congress । Maharashtra Assembly Election 2024 – अतिशय चुरशीच्या बनलेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाचा कौल निर्णायक ठरणार आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण २८८ पैकी ६२ जागा त्या विभागात आहेत. त्यामुळे विदर्भातील अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होईल.
एकेकाळी विदर्भाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानले जायचे. मात्र, ३ दशकांपूर्वी त्या विभागात शिरकाव केलेल्या भाजपने हळूहळू जम बसवण्यास सुरूवात केली. त्यानंतर भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्यातील पहिला मुख्यमंत्री मिळवून देण्यास विदर्भाने मोठा हातभार लावला.
फडणवीस यांनी वर्ष २०१४ ते २०१९ अशा पूर्ण कार्यकाळासाठी राज्याचे नेतृत्व केले. राज्यातील २०१४ मधील निवडणुकीत भाजपने विदर्भात दमदार कामगिरी करताना ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या. मात्र, २०१९ मधील निवडणुकीत भाजपच्या कामगिरीत घसरण झाली. त्यावेळी पक्षाला विदर्भात २९ जागा जिंकण्यावरच समाधान मानावे लागले.
काही महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक भाजपचे टेन्शन वाढवणारी ठरली. विदर्भातील लोकसभेच्या १० पैकी तब्बल ७ जागा कॉंग्रेसने हस्तगत केल्या. तर, भाजपला अवघ्या २ जागा जिंकता आल्या. उर्वरित जागा भाजपचा मित्रपक्ष शिंदेसेनेने जिंकली.
त्या निकालामुळे सुखावलेला कॉंग्रेस पक्ष विदर्भात ताकदीने विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. तो पक्ष विदर्भातील ३९ जागा लढवत आहे. तर, लोकसभा निवडणुकीतील पीछेहाट विसरून भाजपने ४७ जागांवर उमेदवार दिले आहेत.
विदर्भातील ३५ जागांवर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये थेट फाईट होत आहे. इतर जागांवर भाजप आणि कॉंग्रेसचे मित्रपक्ष कशी कामगिरी करणार यालाही मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
हे देखील नक्की वाचा…
राज्यात दुपारी १ पर्यंत ३२.१८टक्के मतदान ; तुमच्या जिल्ह्यात किती टक्के झाले मतदान ? वाचा सविस्तर