लातूर – यवतमाळ येथील सभेआधी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी लातूरमधील औसा येथील सभेआधी देखील उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत.
या घटनेचा व्हिडीओ देखील उद्धव ठाकरे यांनी शूट केला असून त्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वत: उद्धव ठाकरे हे पहिलेच आहेत ज्यांच्या ते बॅगा तपासत असल्याची कबूली दिली आहे. त्यावरून निवडणूक आयोग आकसवृत्तीने या कारवाया करत असल्याची प्रतिक्रीया व संताप व्यक्त केला जात आहे.
औसा येथील हेलिपॅडवर तपासणी –
औसा येथील हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर उतरताच तेथे निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीचा व्हिडीओ शूट केला. त्यांनी सुरुवातीला सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती जणांच्या बॅगा तपासल्या असे विचारले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे हे पहिलेच असल्याचे सांगितले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ”दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक मिळतो का? आज मोदी येतायत. मोदींकडे पाठवतो तुम्हाला. आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे ही माझी जाहीर सभेत मागणी असेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
While the Entirely Compromised commission shamelessly carries on trying to delay Uddhav Thackeray ji to his sabhas by frisking, the question is, why isn’t the PM or other ministers visiting Maharashtra to promote bjp’s loot being frisked this way?
What a disgrace it’s turning… https://t.co/PxPKKsPhTu
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 12, 2024
निवडणूक अधिकाऱ्यांवर राग नाही –
यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माझा तुमच्यावर राग नसल्याचे सांगितले. माझा तुमच्यावर राग नाही पण यांचा जो एकतर्फी कारभार सुरू आहे तो सर्वांसमोर यायला हवा. मोदी देखील आज प्रचाराला येतायत त्यामुळे मला जो न्याय तो मोदींना पण लागला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.