मुंबई – महायुतीच्या सरकार स्थापनेनंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदेसेनेकडून संभावित मंत्र्यांची यादी अंतिम टप्प्यात आहे. यातून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्यासे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच काही नवीन चेह–यांना संधी मिळणार असल्याचे समजते.
शिंदेसेनेकडून जुन्या मंत्र्यांपैकी काहींना वगळले जाणार आहे. कलंकित आणि वैयक्तिक आरोप असलेले तसेच पक्ष संघटनेसाठी काम न केलेल्या मंत्र्यांवर संक्रात येणार आहे. यामध्ये सिल्लोड मतदारसंघातून विजयी झालेले अब्दुल सत्तार आणि विदर्भातील संजय राठोड या दोघांचे नाव वगळलेल्या यादीत सर्वात वरचे असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मराठवाड्यातून अर्जुन खोतकर यांचीही लॉटरी लागू शकते अशी माहिती आहे. अजित पवारांचे शेजारी विजय शिवतारे हे देखील मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाला 10 ते 12 मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यापैकी सात जणांचा शपथविधी हिवाळी अधिवेशनाआधी होईल. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची इच्छा आहे की, पक्षाला जेवढी मंत्रीपदे मिळणार आहे, त्या सर्वांचा शपथविधी पहिल्या टप्प्यातच झाला पाहिजे. भाजप श्रेष्ठी त्यासाठी तयार नाहीत, अशी माहिती आहे.
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठीसाठी त्यांना अजित पवारांपेक्षा अधिकची खाती मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच अजित पवार गटापेक्षा त्यांना अधिक मंत्रिपदे मिळाली पाहिजे अशी शिंदेंच्या आमदारांची मागणी आहे. त्यावरच मोठा खल सुरु आहे. छगन भुजबळ यांनीही स्ट्राईक रेटची भाषा करुन राष्ट्रवादीचा दावा मजबूत केला आहे. आता मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.