परांडा : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघात नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तानाजी सावंत यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, तसेच 23 तारखेला एकनाथ शिंदे फटाखे फोडायला येतोय असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Maharashtra Assembly Election 2024)
धाराशिव जिल्ह्यातील #भूम_परांडा_वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आज परांडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचारसभेस उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. या मतदारसंघाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तानाजी सावंत यांनाच पुन्हा… pic.twitter.com/J8M4DltoUz
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 8, 2024
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करतो, तानाजीराव तुमच्या प्रेमापोटी हे लोक आले. ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा आहे. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही. तानाजीराव जादूगार आहेत. ते जादू करतात, असे शिंदे म्हणाले.
परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उध्दव ठाकरेंनी रणजित पाटील यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र तो मागे घेत शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांची उमेदवारी फायनल झाली आहे. यावरुन देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण त्यांनी विकून टाकला असता. आम्ही शिवसेना वाचवली. बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. गिनिज बुकमध्ये नोंद झाली असं काम तुमच्या पठ्ठ्याने केलंय. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली कामं बघा, होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
परांडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल मोटे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात महायुतीचे तानाजी सावंत हे निवडणूक लढवत आहेत. या दोघांमध्ये निकराची लढाई पहायला मिळत आहे.