मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल मंगळवारी (दि. 29) शेवटची तारीख होती. त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांना आता प्रचाराचे वेध लागले आहेत. शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. पहिली सभा रत्नागिरी येथे होणार आहे. कोकणातून ते आपल्या पक्षाचा आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून होईल आणि 17नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सभा घेऊन जनतेला संबोधित करणार आहेत. ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुक काळात 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवेनेतील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याही सभा होणार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आता 288 मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. त्यामुळे, या लढाईत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये, राज्यातील ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. यंदा प्रथमच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी, सर्वच बड्या नेत्यांकडून प्रचारासाठी रणनीती आखली जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याही महाराष्ट्रात 10 ते 15 सभा होणार असल्याची माहिती आहे. दिवाळीनंतरच म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघात सभा घेतील.