मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रे ची भूमिका घेत विधानसभा लढवण्याची तयारी केली. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेच्या ७ याद्या जाहीर केल्या. यामधून त्यांनी एकूण 138 उमेदवार जाहीर केले होते. मात्र आता निवडणुक आयोगाने राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने मनसेच्या एका उमेदवाराचा अर्ज रद्द केला आहे. त्यामुळे आता मनसेचे 137 उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
‘या’ उमेदवाराचा अर्ज केला रद्द
अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदारसंघातून राज ठाकरेंच्या पक्षाने प्रशांत आंबेरे यांना संधी दिली. प्रशांत आंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशांत यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
का रद्द केला अर्ज?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची अट घातली आहे. मात्र अकोला पश्चिमचे मनसे उमेदवार प्रशांत आंबेरे यांचं वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्याने यांचा नामांकन अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला आहे.
मनसेकडून उमेदवारी मिळालेल्या प्रशांत आंबेरेना वयाची 25 पूर्ण करण्यासाठी अवघे 24 दिवस कमी पडले आहेत. मात्र वयाची अट ही मूलभूत अट असल्याने निवडणूक आयोगाकडून प्रशांत आंबेरेना थेट अपात्र ठरवण्यात आलं आहे.