Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म देत, त्यांची उमेदवारी घोषित केली आहे.
मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर त्यांची कन्या सना मलिक यांना यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अनुशक्ती मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
नवाब मलिक यांनी आपल्याला विरोध झाला तरी आपण निवडणूक भरणार असल्याचे म्हटले होते. “मी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
मी अपक्ष उमेदवार म्हणूनही फॉर्म भरला होता. पण पक्षाने अखेरच्या क्षणी दुपारी 2: 55 वाजता एबी फॉर्म पाठवला आणि आम्ही तो सादर केला. आता मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भाजपच्या विरोधानंतरही राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांची कणखर भूमिका पाहायला मिळत आहे. ते म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे,
मी अजितदादांच्या पाठीशी आहे, त्यांनीच मला उमेदवारी दिली आहे, आता महायुतीचे लोक, मग ते भारतीय जनता पक्षाचे असो वा शिवसेनेचे, ते माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आता माझा लढा त्यांच्याशी आहे. असं ते म्हणाले आहते.
अजित पवार किंगमेकर !
मलिक पुढे म्हणाले की, “निवडणुकीनंतर अजित पवार किंगमेकरची भूमिका बजावतील, महाराष्ट्रात अत्यंत कठीण स्पर्धा आहे. कोणाला बहुमत मिळेल हे सांगता येत नाही. दोन्ही बाजूंनी 3 पक्षांची युती आहे.
त्यामुळे सरकार स्थापनेत अजित पवारांचा मोठा वाटा असेल. अजित पवार महाराष्ट्रात किंगमेकरच्या भूमिकेत असतील याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही.” असं देखील नवाब मलिक म्हणाले.
‘ज्याप्रकारे माझे अंडरवर्ल्डशी संबंध जोडले जात आहेत, लोकांनी विधानसभेत मला देशद्रोही म्हटले जात आहे ते अत्यंत वाईट आहे. जो कोणी माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या विरोधात बोलण्याचा आणि माझा बचाव करण्याचा मला अधिकार आहे. त्यामुळे माझ्यावर हे खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.”