कोल्हापूर – शिरोली एमआयडीसी हद्दीतील काच विक्रीच्या गोडाऊनमध्ये क्रेनचा बेल्ट तुटून एक टन काचा अंगावर पडल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. संदीप खरोशे (रा. नृसिंह कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) असे मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या दुर्घटनेची हकीकत अशी की, शिरोली नागाव फाट्यावर मोमीन यांचे काचेचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये काच भरण्यासाठी गोडाऊनमध्ये क्रेन बसवण्यात आली आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास संदीप खरोशे हे काचा भरण्यासाठी टेम्पो घेऊन मोमीन यांच्या गोडाऊनमध्ये गेले.
यावेळी काचा टेम्पोमध्ये भरत असताना अचानक क्रेनचा बेल्ट तुटला आणि काचा खरोशे यांच्या अंगावर पडल्या. यात खरोशे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.