मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट, शिवसेनेचा ठाकरे गट व काँग्रेस यावरून आक्रमक झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचे कारण सांगितले. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचे डिझाईन देखील नौदलानेच तयार केले होते. हा पुतळा कोसळल्याचे वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले.
मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या तिथे (घटनास्थळी) नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत. उद्या नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.