महापुराच्या जखमा भळभळत्याच!

सार्वजनिक पडझडींची अजूनही डागडुजी नाही


रस्ते बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय कायम


पालिका प्रशासन मात्र अहवाल, कागदपत्रांत गुंग

पुणे – आंबिल ओढ्यावरील पूर ओसरुन आता दोन महिने होत आहेत. यात ज्यांचे संसार उद्‌ध्वस्त झाले, तेदेखील हळूहळू पूर्ववत होत आहेत. पण, या पुरात जी सार्वजनिक पडझड झाली, ती मात्र अजूनही तशीच आहे. उखडलेले रस्ते असो, किंवा ओढ्याच्या सीमाभिंती असो. परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. कात्रज ते पद्‌मावतीपर्यंत आंबिल ओढ्याची पाहणी केली असता, या बाबी समोर आल्या.

गुरुराज सोसायटी
येथील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यावेळी पुरामध्ये वाहून आलेला राडारोडा अजूनही परिसरात तसाच आहे. त्याचे काही ठिकाणी ढिग झाले आहेत. सोसायटीची वाहून गेलेली सीमाभिंत अजनूही पडकीच आहे. त्याची दुरुस्तीही झालेली नाही.

के. के. मार्केट
परिसरात पुरामुळे मोठी हानी झाली. येथीलही सीमाभिंत पडली आहे. त्याची डागडुजी अजनूही करण्यात आलेली नाही. ओढ्यातील पाण्याबरोबर तिचे काही अवशेष वाहत आहेत. त्यामुळे ही माती भविष्यात पुन्हा कोठेतरी अडकून पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. हे प्रशासनाच्या लक्षात आलेले दिसत नाही.

लेक टाऊन
येथील रस्ता महापुरात वाहून गेला आणि त्यामुळे सुमारे 10 ते 15 फूट खोल आणि 25 फूट रुंद असा खड्डा पडला आहे. तो बुजवून रस्ता अजूनही सुरू झालेला नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे. सुखसागर परिसरात जाण्यासाठी हा सोपा मार्ग आहे, पण तो बंद असल्यामुळे नागरिकांना अपर इंदिरानगर येथे वळसा घालून जावे लागत आहे. दरम्यान, पुरानंतर येथे काहीही सुधारणा झाली नसून, येथे पालिकेने एक रखवालदार नेमला आहे’ असे स्थानिकांनी सांगितले.

कात्रज प्राणीसंग्रहालय
या पुराच्या पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे येथील 80 फूट रुंद सीमाभिंत जमीनदोस्त झाली. त्यामुळे पाणी प्राणी संग्रहालयात शिरले. या भिंतीची दुरुस्ती झालेली नाही. येथे आता पाण्याची डबकी निर्माण झाली होती. त्यात आता डासांची पैदास होत आहे. जागोजागी सीमाभिंत पडल्यामुळे कधीही अपघात घडू शकतो, अशी परिस्थिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.