महानायक : पवारसाहेब

– ऍड. संदीप कदम

मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे. अधिसभा सदस्य (सिनेट), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
साहेबांचा महानायक बनण्याचा प्रवास एवढा सोपा नव्हता. पवारसाहेब व्यक्‍ती नसून एक विचारधारा आहे. किंबहुना एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. विद्यापीठ ज्ञानदानाचे कार्य करते. या विद्यार्थ्यांना ऊर्जा, शक्‍ती देण्याचे काम करते. नवनवीन कल्पना, संशोधन यांना प्राधान्य देत तळागाळातील समाजापासून सर्वांना विद्यापीठ सामावून घेते.अगदी तसंच साहेब सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे प्रेरणा व दिशा देणारे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यांच्या कल्पनेतून व प्रयत्नांतून देशातील शेती, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण, संरक्षण इत्यादी क्षेत्रांचा विकास झालाय. शेतकरी, कष्टकरी, वंचित, पददलित, महिला, बांधावरील सर्वसामान्यांपासून ते शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, कलाकार, खेळाडू, साहित्यिक, सीमेवरील जवानांपर्यंत सर्वांना ते आपले वाटतात. अगदी बिल गेटस, ओबामा यांच्यापासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांना समानतेने सामावून घेणारं हे विद्यापीठ!

काळाच्या घोंगावत्या वादळात अनेक लोक पालापाचोळयाप्रमाणे उडून गेले त्यांचे अस्तित्वही संपले, पण पाच दशकांहून अधिक काळ पवारसाहेब हे सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी राजकारणाबरोबर समाजकारणही तितकेच गतिमान केले. त्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना, प्रयोग, संशोधन, सिद्धांत यांना प्राधान्य दिले. तसेच साहेबांनी सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व ज्ञानविज्ञानाचा आग्रह धरला. यामागे त्यांचा अभ्यासूपणा, द्रष्टेपणा, खंबीरता, तत्वनिष्ठता, संघर्षशिलता व संयम हे आष्टपैलू गुण कारणीभूत आहेत. आज आपण जलयुक्‍त शिवार योजनेचे गोडवे गातो, पण या योजनेची पायाभरणी साहेबांनीच केलीय. राज्यातील पाटबंधारे, पाझर तलाव, नालाबंडिग, ठिबक सिंचन यांना प्राधान्य देऊन पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवून शेतीसाठी वापर करावा यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा योजना आखली. या योजनेचासर्व खर्च सरकारने करावा असा क्रांतिकारक निर्णय घेतला. उजनी धरण, जायकवाडी प्रकल्प, कृष्णा प्रकल्प, कळमवाडी प्रकल्प, कुक्कडी-मुळा या प्रकल्पांना गती दिली. शेतकऱ्यांना त्वरीत कर्जपुरवठा होण्यासाठी सहकारी संस्थांचे जाळे उभारले. शेतीमालाच्या योग्य भावासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना संकरित वाणांच्या लागवडीस प्रोत्साहित केले. शेतीबाबत धोरणात्मक निर्णय घेवून हरितक्रांतीचा पाया घातला.

देशाने उद्योगविश्‍वात भरारी घेण्यासाठी साहेबांनी औद्योगिकीकरणाचा पुरस्कार केला. देशात विविध उद्योगांचे चौफेर जाळे निर्माण करण्यात, त्याचा विस्तार करण्याची भूमिका त्यांनी घेतली. उद्योग व्यवसायांचे खेडयापाडयांमध्येही विकेंद्रीकरण केले. प्रत्येक तालुक्‍यात औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. इंडस्ट्रीयल बेल्ट उभे केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या शहरांबरोबरच मराठवाडा, कोकण, खानदेश, विदर्भ विभागांचाही विकास होण्यास मदत झाली.

रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, विद्या प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पवार चॅरिटेबल पब्लिक ट्रस्टयासारख्या संस्था साहेबांच्या प्रेरणेतून लाखो विद्यार्थ्यांना घडवत आहेत. प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत आणि तांत्रिक शिक्षणापासून संगणक व जैवतंत्रज्ञानापर्यंत जागतिक स्पर्धेची आव्हाने पेलणारे शिक्षण देशवासियांना मिळावे यासाठी ते आग्रही राहिले. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचावी म्हणून साहेबांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाची स्थापना केली. बहुजन समाजातील मुले स्पर्धेत मागे पडू नयेत यासाठी नुकतेच अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या माध्यमातून राजर्षिशाहू ऍकॅडमीची स्थापना केली. नवयुवकांकडे विविध व्यावसायिक कौशल्ये यावीत यासाठी कलाकौशल्य विकासकेंद्राच्या स्थापनेसाठीही त्यांनी पुढाकार घेतला. शास्त्रज्ञ, विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, संशोधक यांनाही साहेब आपलेच वाटतात. राजकीय नेतृत्वाने शैक्षणिक क्षेत्रात व धोरणात विनाकारण लुडबूड करू नये असे ते म्हणतात. त्या सर्वांचा अनुभव गेली 22वर्षे मी सातत्याने जवळून घेत आहे.

साहित्य, कला, संस्कृती, नाटक, संगीत, भाषा या क्षेत्रांशीही साहेबांची वीण घट्टीपणे जोडलीय. या क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत. याबाबतीत ते चव्हाणसाहेबांचे खरेखुरे वारसदार ठरतात. देशाच्या व जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एखादी भीषण घटना घडल्यास व आपत्ती कोसळल्यास साहेबांना अत्यंत अस्वस्थ व बेचैन होताना मी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच पवारसाहेब ही एक व्यक्‍ती नसून विचारधारा आहे, एक मिशन आहे, तळागळातील शेतकरी, वंचित, कष्टकरी समाजाची प्रेरणा आहे. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची आशा आहे. साहेब, हे भारताच्या गौरवशाली इतिहासाचे एक सुवर्णपान आहे.या वैश्‍विक लोकनेत्यास व महानायकास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.