मंचर, (प्रतिनिधी) – पुणे-नाशिक महामार्गावरील गायमुख फाटा येथे महानंदीचे पाषाणातील शिल्प बसविण्यात आले आहे. या शिल्पामुळे आंबेगाव तालुक्याच्या वैभवात भर पडणार आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनाला जाताना भाविकांना नंदीचे दर्शन घेऊन जाता येणार असल्याचे मत पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी व्यक्त केले.
पुणे-नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल व इतर कामे टी अँड टी इन्फा लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-नाशिक महामार्ग गायमुख फाटा येथे महानंदीचे शिल्प व्हावे, अशी इच्छा स्थानिक ग्रामस्थांनी बोलून दाखवली होती त्यानंतर कंपनीचे संचालक श्रीमंत तांदूळकर यांनी 20 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी महानंदीची मूर्तीचे अनावरण आर्ट ऑफ लिविंगचे देवप्रत स्वामी यांच्या हस्ते प्झाला.
यावेळी उद्योजक भरत भोर, शिवसेना (ठाकरे गट) सुरेश भोर, कंपनीचे श्रीमंत तांदूळकर, सरपंच प्राजक्ता तांबडे, बाबुराव तांबडे, उपसरपंच मयूर भोर, भीमाशंकरचे संचालक आनद शिंदे, अवसरी खुर्दचे उपसरपंच अनिल शिंदे, माउली भोर याच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
वजन साडेसात टन
गायमुख फाटा येथे बसवण्यात आलेली नंदीची मूर्ती पूर्ण पाषाण काळ्या दगडाची बनवलेली असून, हा दगड कर्नाटक वरून मागविण्यात आला होता. ही मूर्ती घडवण्याचे काम दीड वर्षे सुरू होते. कर्नाटकातील कारागिरांनी हे शिल्प घडवले असून नंदीची उंची पाच फूट, रुंदी साडेचार फूट तर लांबी सहा फूट आहे. नंदीचे वजन अंदाजे साडेसात टन असून सर्व मूर्ती एकच दगडात बनवलेली असल्याने पुढील शेकडो वर्ष ती सुस्थितीत राहणार असल्याचे श्रीमंत तांदूळकर यांनी सांगितले.