पुणे, – कात्रज ते स्वारगेट या विस्तारीत मेट्रो मार्गास केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर या मार्गावर बालाजीनगर येथे भुयारी मेट्रो स्थानक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, हे अतिरिक्त स्थानक उभारण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, या स्थानकाचा खर्च महापालिकेकडून न करता तो सर्व महामेट्रो करणार असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
मेट्रोचा कात्रज ते स्वारगेट हा विस्तारीत मार्ग सुमारे ५.४०० कि.मी.चा आहे. या मार्गावर आधी तीन स्थानके प्रस्तावित होती. त्यात स्वारगेट, गुलटेकडी, पद्मावती आणि कात्रज अशा चारच स्थानकांचा समावेश होता. या मार्गासाठी सुमारे २ हजार ९५४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पुणे महापालिका महापालिकेच्या आर्थिक सहभाग १५ टक्के ( ४८५ कोटी) तर या कामासाठी लागणाऱ्या महापालिकेच्या जमीनीची किंमत ( २४८ कोटी) देणार आहे.
मात्र, त्यानंतर आता नवीन स्थानक वाढल्याने त्याचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे या स्थानकाबाबत महापालिका प्रशासन आणि महामेट्रोच्या झालेल्या बैठकीत त्यात, या वाढीव स्थानकाचा तसेच प्रकल्पाचा खर्च वाढल्यास महापालिका तो देणार नाही, अशी चर्चा झाली. त्यात, महामेट्रोनेही सहमती दर्शविली आहे. त्यानुसार, महामेट्रोला या वाढीव स्थानकासाठी तत्वत: मान्यता देण्यास महापालिका प्रशासनाकडून मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे.