उत्पन्न हिस्सा देण्यास महामेट्रोचा महापालिकेला नकार

महापालिकेच्या मागणीचा चेंडू शासनाच्या कोर्टात

पुणे – स्वागरेट येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिमॉडेल हबमधील उत्पन्नाचा हिस्सा महापालिकेस देण्यास महामेट्रोने नकार दिला आहे. तूर्तास या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रोचे प्राधान्य आहे. केंद्र व राज्यशासनाने याबाबत निर्णय घेणे उचित होईल, असे महामेट्रोने महापालिकेस कळविले आहे. हा अभिप्राय स्थायी समितीने मान्य केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 महापालिकेची जागा घेऊन महामेट्रो प्रशासन स्वारगेट येथे मेट्रो स्थानकासह मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारत आहे. स्थानक वगळता इतर सर्व भागाचा वापर व्यावसायिक म्हणून केला जाणार आहे. त्यामुळे महामेट्रोस कोट्यवधींचे उत्पन्न अपेक्षित आहे. ही जागा पालिकेची असल्याने तसेच महापालिकाही या प्रकल्पात भागीदार असल्याने यातून मिळणाऱ्या व्यावसायिक उत्पन्नातील 40 ते 50 टक्के उत्पन्न पालिकेस मिळावी, अशी मागणी पालिकेच्या काही सदस्यांनी केली होती.

त्यानुसार ऑगस्टमध्ये स्थायी समितीने या मागण्याच्या अनुषंगाने महामेट्रोकडून अभिप्राय मागवण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या होत्या. महामेट्रोने हा अहवाल स्थायी समितीत सादर केला. त्यात मेट्रोने महापालिकेचे या हबचे उत्पन्न देण्यास स्पष्ट शब्दांत नकार देत हा निर्णय केंद्र व राज्याने घेणे अपेक्षित असल्याचे कळविले आहे. तसेच मेट्रोला तिकीट विक्रीतून केवळ 40 टक्के उत्पन्न मिळणार असून मेट्रोची सेवा देताना येणारा दैनंदिन खर्च, प्रकल्पासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते, तसेच इतर खर्च करण्यासाठी या हब मधून मिळणारे 60 टक्के उत्पन्न वापरण्यात येणार असल्याचे पालिकेस कळविले आहे. महापालिकेने या संपूर्ण प्रकल्पासाठी ज्या जागा दिल्या आहेत, त्याचा मोबदला महापालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी दिलेल्या जागेतून वळता केला असून, राज्य शासनाने मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस 500 मीटरपर्यंत टीओडी अंतर्गत 4 एफएसआय वापरास परवानगी दिली आहे.

हे उत्पन्न पालिकेलाच मिळणार असल्याचे मेट्रोने अभिप्रायात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मागणीला मेट्रोने पुन्हा एकदा रीतसर केराची टोपली दाखविली असून उत्पन्नचा चेंडू केंद्र व राज्यशासनाच्या कोर्टात टोलविला आहे.

मेट्रोला मिळणाऱ्या उत्पन्नात केवळ चांगली सेवा देणे हा उद्देश असून हा प्रकल्प सुरू झाल्यानंतरच त्याला होणारा फायदा आणि तोटा समोर येणार आहे. त्यामुळे तूर्तास आयुक्तांनी सादर केलेला मेट्रोचा अभिप्राय मान्य केला आहे.

– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.