महामेट्रो ठेकेदाराच्या गुंडगिरीचे पालिकेत पडसाद 

पिंपरी  – स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांना मिळालेल्या जिवे मारण्याच्या धमकीचे पडसाद महापालिकेत उमटले. या घटनेबरोबरच कचऱ्याच्या मुद्यावरून स्थायी समितीची आजची साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली. येत्या 24 तासांत या घटनेचा अहवाल महामेट्रोबरोबरच महापालिका अधिकाऱ्यांनी सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीला महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनादेखील आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य समजून घ्यावे. शहरात अशी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. नियंत्रण नसलेले ठेकेदार नेमू नका, अशा या बैठकीत कानपिचक्‍या देण्यात आल्या. या धक्कादायक घटनेची अनेक नगरसेवकांना माहिती नव्हती. स्थायीच्या सभेत ही बाब समजल्यानंतर सर्वच जण अवाक्‌ झाले. सर्वच स्थायी सदस्यांनी या घटनेचा निषेध केला. दरम्यान, महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबाबत उद्या (दि.11) दिल्लीत बैठक होणार असून आयुक्‍त श्रावण हर्डीकर व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितदेखील उपस्थित राहणार आहेत. याबैठकीनंतर दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये या घटनेची चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.