म्हाळुंगेतील राकेश गंगावणे टोळीला मोका

 

पिंपरी (प्रतिनिधी) – चाकण जवळील म्हाळुंगे येथील राकेश गंगावणे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

राकेश ऊर्फ किरण बाळासाहेब गंगावणे (वय 27, रा. दळवीनगर, चिंचवड), अभिषेक पांडुरंग गोसावी (वय 25, रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड), शुभम नंदू अवतारे (वय 24), सुरज नारायण कांबळे (दोघेही रा. बारणे चाळ, क्रांतीनगर, थेरगाव) अशी मोक्‍काची कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्‍काची कारवाई करण्यात आलेले चारही जण सराईत गुन्हेगार असून टोळीचा प्रमुख राकेश गंगावणे याच्यावर दहा लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. लूटमार करुन पैसे कमाविण्यासाठी टोळी तयार केली होती. पुणे नाशिक महामार्ग व म्हाळुंगे परिसरातील वाटसरूंना शस्त्राचा धाक दाखवून तसेच मारहाण करून ही टोळी लूटमार करीत असे. म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्‍के यांनी गंगावणे टोळीवर मोकाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला.

हा प्रस्ताव परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍त स्मिता पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठविला. पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी या प्रस्तावाची छानणी केली.

अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांनी गुरुवारी (दि. 2) या टोळीला मोका लावण्याच्या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली. पीसीबी गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार सचिन काळे आणि म्हाळुंगे चौकीतील पोलीस नाईक संपत मुळे यांनी हा प्रस्ताव तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.