न्याय देणारेच लाचखोर : नागरिकांसह उद्योजकांनी फोडला टाहो
महाळुंगे इंगळे -“सद्रक्षणाय खलनिग्रनाय’ हे ब्रीद वाक्य सत्यात उतरविण्याऐवजी पोलीस प्रशासन नागरिकांना विनाकारण वेठीस धरत असल्याचा प्रकार समोर येवू लागला आहे. गुन्ह्याची “क’ समरी मंजूर करून गुन्ह्याच्या तपास कामात महत्त्वपूर्ण मदत करतो, असा बहाणा करून त्यापोटी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने “महाळुंगे इंगळे पोलीस चौकी’ की, “लाचखोरीचा अड्डा’ अशी चर्चा या भागात सुरू झाली आहे. न्याय देणारेच लाचखोर निघत असल्याने नागरिकांसह पंचक्रोशीतील उद्योजकांनी टाहो फोडला आहे.
चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे पोलीसचौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास अण्णासाहेब जाधव (वय 56), पोलीस नाईक अजय रामदास भापकर (वय 47) आणि त्यांचा एक खासगी व्यक्ती अशा तिघांवर लाच मागितल्याप्रकरणी अटक केली असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
महाळुंगे इंगळे (ता. खेड ) येथे नव्याने स्वतंत्र पोलीस चौकी व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थ व उद्योजकांनी केली होती. चाकण पोलीस ठाण्यात अपुऱ्या असलेल्या मनुष्य बळामुळे तेथील पोलिसांचा कामाचा प्रचंड ताण कमी व्हावा, यासाठी शासनाची कुठलीही मान्यता नसताना महाळुंगे इंगळे येथे केवळ आयुक्तालयस्तरावर चाकण अंकित न ठेवता स्वतंत्र चौकी स्थापण्यात आली. या पोलीस चौकीच्या माध्यमातून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश बसेल, असा पोलीस व त्यांच्या वरिष्ठांचा कयास होता. नागरिकांना न्याय मिळण्यास खरोखरच मदत होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता.
मात्र, प्रत्यक्षात चाकण एमआयडीसीचा बराच भाग या पोलीस चौकीच्या ताब्यात आल्याने या चौकीच्या माध्यमातून सामान्य नागरिक आणि उद्योगांना न्याय मिळणे तर सोडाच, “मलई आयती’ कशी मिळेल, या आशेने त्रासच सर्वाधिक होत असल्याचे बोलले जात आहे. महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे प्रमुख भानुदास जाधव हेच लाचखोरीच्या प्रकरणात गजाआड झाल्याने चाकण उद्योग पंढरी ढवळून निघाली आहे. एकूणच या पोलीस चौकीतील सावळा गोंधळ लक्षात घेऊन ही चौकी पुन्हा चाकण पोलिसांच्या अंकित येते की काय, या चर्चेला उधाण येवू लागले आहे.
वसुलीसाठी खासगी बहाद्दर
कामाच्या मोबदल्यातून लाच गोळा करण्यात खासगी व्यक्ती पोलिसांचा गुप्त खासगी वसुली बहाद्दर असल्याचेच या घटनेने अधोरेखीत केले आहे. मागील अनेक वर्षांपासून असे खासगी वसुली बहाद्दर वेगवेगळ्या पद्धतीने चाकण औद्योगिक वसाहतीत कलेक्शनची कामे करीत असल्याची चर्चा होती. बाहेरच्या बाहेर आर्थिक व्यवहार विनासायास पार पडावेत, यासाठी अशी काही मंडळी पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने कार्यरत आहेत. सर्व काही आलबेल असल्याचे सांगत महाळुंगे इंगळे पोलिसांनी अशा खासगी हस्तकांना हाताशी धरून पैशांसाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.