महालक्ष्मी एक्‍स्प्रेस: 17 तासानंतर संपले थरारनाट्य

महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई – मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरील बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकली. या ट्रेनमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची अखेर 17 तासांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान लिलया पेलत एनडीआरएफ, वायुदल आणि नौदल यांनी या सगळ्या प्रवाशांना संकटातुन बाहेल काढले.

मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्‍स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. त्यानंतर सकाळपासूनच बचाव कार्य सुरु करण्यात आले. वायुदलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकली. या ट्रेनला चहुबाजूंनी पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण येत होता. पण एनडीआरएफच्या टीमने अथक परिश्रम केल्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना बदलापूरहून कल्याणला आणले जाणार आहे.

त्यानंतर कल्याणवरुन कसारा, इगतपुरी मनमाडमार्गे विशेष रेल्वे कोल्हापूरला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, वांगणी येथे पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर ते कर्जत, खोपोलीदरम्यानची सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड आणि दौंडमार्गे वळविण्यात आल्या.

असे पार पडले रेस्कू ऑपरेशन?

– मुंबईतून 50 जणांची टीम एकूण 6 बोटीच्या सहाय्याने बचावकार्यात सहभागी
– पुण्यातून 40 जणांची टीम आणखी 5 बोटींसह बचावकार्य करण्यासाठी बदलापूरमध्ये
– अडकलेल्या प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी नौसेना आणि एनडीआरएफ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क केला.
– प्रवाशांना वाचवण्यासाठी नेव्हीचे सी किंग हेलीकॉप्टरची मदत
– हेलिकॉंप्टरमध्ये नेव्हीचे पाणबुडे ही रेस्कू बोट आणि इतर बचाव साहित्यासह पोहचले
– सलग काही तासांच्या मेहनतीनंतर सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)