प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणा-या कुंभमेळ्याची सोमवार दि. १३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न झाले.
सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत २० लाख भाविकांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात पाण्यात डुबकी मारली आहे.
उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये होणा-या या महाकुंभ मेळाव्यासाठी ४५ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठी साधू-संत, भाविक तसेच परदेशातील व्यक्ती सहभागी होणार असल्याने यंदा सुरक्षेसाठी ५५ हून अधिक फोर्स असणार आहेत. तसेच तब्बल ४५,००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
महाकुंभच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमे-यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम केले आहे. त्यासोबतच अक-आधारित तब्बल २६८ व्हीडीओ कॅमेरे गर्दीच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी आणि पार्किंगची सोय करण्यासाठी २४० एआय-आधारित प्रणाली तैनात करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीला अंतिम स्नान
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिला शाही स्नान १३ जानेवारी म्हणजे आज पार पडले आहे. तर दुसरे शाही स्नान १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरे स्नान २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल. तर चौथे स्नान २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्नान १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.