Mahajyoti Training – स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अपुऱ्या जागांचा गंभीर प्रश्न भाजप युवा मोर्चाने सातत्याने शासनासमोर मांडला होता. या मागणीची दखल घेत राज्य शासनाने महाज्योतीमार्फत यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणाच्या जागांमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) मार्फत ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. मात्र, मर्यादित जागांमुळे अनेक पात्र व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाने शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार यूपीएससीसाठी प्रशिक्षणाच्या जागा १०० वरून ४०० करण्यात आल्या असून, एमपीएससीसाठी ४०० असलेल्या जागा वाढवून तब्बल १,००० करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे तांत्रिक व विविध विद्याशाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत जाण्याची मोठी संधी मिळणार आहे.यावेळी सरचिटणीस स्वप्नील मोडक, ओमकार कड्डे, अमर बुदगुडे, रसिक सणस, जगदीश कोळेकर, संदीप केसकर, विवेक साळुंखे, सुयोग सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. “जागा वाढवण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे तसेच महाज्योतीचे संचालक नारंगी सर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हे सरकार नेहमीच विद्यार्थीहिताचे निर्णय घेणारे असून मुख्यमंत्री सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.” – वैभव सोलनकर, जिल्हा अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, पुणे ग्रामीण