महाकरिअर पोर्टल देणार भविष्याला ‘दिशा’

विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या, प्रवेश परीक्षा याबाबतची माहिती उपलब्ध

पुणे : इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम, शिष्यवृत्त्या, प्रवेश परीक्षा याबाबतची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने युनिसेफच्या सहकार्याने महाकरिअर पोर्टल तयार केले आहे. याचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वापर करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होत असते. यावर कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत अनेकदा संभ्रमावस्था असते. त्याचवेळी विद्यार्थ्याला करिअर विषयक मार्गदर्शनाची खरी गरज असते. विद्यार्थी बऱ्याचवेळा पुढील अभ्यासक्रम निवडताना आई-वडिल, मित्रांच्या सांगण्यावरून करिअरची निवड करतो आणि भविष्यामध्ये योग्य मार्गदर्शनाअभावी पुढील अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याला अनेक अडचणी येतात.

विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतानाच्या टप्प्यावर करिअरची निवड करताना त्याला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, त्याला अनुरुप असे कोणते अभ्यासक्रम देशपातळीवर उपलब्ध आहेत आणि त्यातील कोणता अभ्यासक्रम उपयुक्‍त आहे याची अचूक माहिती मिळणे आवश्‍यक असते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर व्यावसायिक व नोकरी संधी याची माहिती मिळणे गरजेचे आहे.

महाकरिअर पोर्टलवर विद्यार्थ्यास सुमारे 555 करिअर, सुमारे 21 हजार महाविद्यालये, संस्था, 1 हजार 150 विविध प्रवेश प्रक्रिया, 1 हजार 200 विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना महाकरिअर पोर्टलच्या वेबसाइटवर जाऊन शाळेने दिलेला आपला सरल आयडीचा वापर करून पोर्टलचा वापर करता येणार आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचा सरल आय.डी. उपलब्ध करून द्यावा अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, जिल्हा परिषदेचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी आदींना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.