अग्रलेख : पत्रातून घडलेलं महाभारत

कॉंग्रेस पक्षात आज एकाएकी मोठं महाभारत घडलं. पक्षाच्या 23 नेत्यांनी पक्षाला आता पूर्णवेळ अध्यक्ष नेमला पाहिजे, अशी सोनिया गांधी यांना विनंती करणारे पत्र लिहिले. कोणा तरी महाभागाने ते पत्र आणि त्यातील मजकूर मीडियाकडे जाहीर केले आणि त्यातून हे महाभारत घडलं. आजच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यातील घडामोडींच्या अनुषंगाने जे तपशील मीडियापुढे आले त्यातून वेगवान घडामोडींचा एक रंजक राजकीय पटच लोकांपुढे उभा राहिला.

कॉंग्रेसमध्ये नेमके कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणाच्या विरोधात आहे हेच लोकांना समजेनासे झाले. प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनीही मग आपापल्या परीने यात आपला हात धुऊन घेत आपला राजकीय हिशेब पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज घडलेल्या या साऱ्या प्रकारामुळे मोठाच राजकीय तमाशा झाला. मुळात सोनिया गांधींना असे पत्र पाठवण्याची या नेत्यांना हिम्मतच कशी झाली, हाच मुख्य मुद्दा घेऊन कॉंग्रेसमधील नेत्यांनी आपापल्या भूमिका घेतल्या.

पत्र पाठवणाऱ्या नेत्यांना पक्षात एकटे पाडण्याचाही प्रयत्न झाला. सरतेशेवटी पत्र पाठवणारे 23 जण एकीकडे आणि सारा कॉंग्रेस पक्ष आणि गांधी परिवार एकीकडे अशी सरळ विभागणी कॉंग्रेसमध्ये दिसून आली. या साऱ्या घडामोडीतून कॉंग्रेसची मात्र पुरती शोभा झाली. मुळात जिथे पक्षाच्या अस्तित्वाचाच आज मुख्य प्रश्‍न आहे तिथे पक्षात नेतेपदावरून इतकं मोठं महाभारत घडावं हीच एक विशेष बाब होती.

वास्तविक पाहता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कॉंग्रेसमधील अत्यंत ज्येष्ठ अशा 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष या नात्याने सोनियांना जे पत्र पाठवलं, त्यात फार वावगं असं काही नव्हतं. सध्या गेले सुमारे दीड वर्ष पक्षाचे अध्यक्षपद हंगामी स्वरूपात सोनिया गांधी यांच्याकडे आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्या कोठे फारशा फिरत नाहीत किंवा पक्षाच्या दैनंदिन कारभारातही त्या लक्ष घालत नाहीत. भाजपसारख्या मातब्बर पक्षाच्या विरोधात लढाई लढताना पक्षाला नव्याने उभारी देण्याचे प्रयत्न करणारे एक खंबीर आणि पूर्णपणे सक्रिय नेतृत्व असले पाहिजे, एवढी साधी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्‍त केली होती.

कॉंग्रेसमधील अनेकांनी सोनिया गांधी यांचे हे हंगामी अध्यक्षपद दीड वर्ष सहन केले. पण अजून किती काळ पक्षाला आपण या अवस्थेत ठेवणार आहोत, हा या लोकांचा साधा प्रश्‍न होता. त्यात त्यांनी सोनियांच्या नेतृत्वाला आव्हान दिले किंवा राहुल गांधींना नाकारले, असे झाले नाही. गांधी-नेहरू परिवार हा नेहमीच कॉंग्रेसचा गाईडिंग फोर्स राहील, अशी ग्वाहीही या नेत्यांनी याच पत्रात दिली होती. पण तरीही कॉंग्रेसमधील जुन्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधातील हिशेब पूर्ण करण्याची ही संधी साधली आणि त्यातून हा सारा प्रकार घडला.

आपणच गांधी-नेहरू परिवाराचे खंदे पुरस्कर्ते आहोत हे दाखवण्याची स्पर्धा लागली. यातून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांभोवतीच संशयाचे वातावरण निर्माण होते आहे याचीही कोणी तमा बाळगली नाही. त्यातून जे गोंधळाचे चित्र निर्माण झाले ते कॉंग्रेसला नुकसानदायक होते. ही स्थिती निर्माण होणे कॉंग्रेसला आजच्या घडीला तरी परवडण्यासारखे नाही. खरं म्हणजे कॉंग्रेसमध्ये सध्या जी निर्णायकी अवस्था निर्माण झाली आहे ती, त्वरित कायमस्वरूपी पक्षाध्यक्ष नेमून एका दिवसात दूर होऊ शकते. त्यासाठी मधला दीड वर्षाचा वेळ घालवण्याची गरजच नव्हती. पण सगळेच प्रश्‍न लांबवत ठेवायचे ही कॉंग्रेसची एक अंगभूत कार्यशैली असल्याने त्यांनी हा विषय नाहक लांबवत ठेवला. त्याचा कधी ना कधी असा विस्फोट होणे अपेक्षितच होते.

स्वत: सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्षपदावर राहण्यात फारसे स्वारस्य नाही. त्या केवळ तात्पुरती ऍरेंजमेंट म्हणून ही जबाबदारी सांभाळत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी हे पद स्वीकारण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत सोनियांकडेच अध्यक्षपद ठेवून वेळ निभावून न्यायची ही कॉंग्रेसच्या धुरिणांची एकूण स्ट्रॅटेजी होती. सुरुवातीला पक्षातल्या सगळ्यांनाच ही व्यवस्था मान्य होती. पण ही तात्पुरती व्यवस्था जशी लांबत गेली तसा नेत्यांचा धीर सुटत गेला. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसने तीन राज्यांतील सत्ता गमावली. पक्षातील आमदार फुटीमुळे सुरुवातीला कर्नाटकची सत्ता गेली. बहुमत असताना मध्य प्रदेशातील सत्ता गेली आणि संख्याबळाच्या बाबतीत अत्यंत समाधानकारक स्थिती असताना राजस्थानही हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली. गोवा, मणिपूरसारख्या राज्यात भाजपपेक्षा जादा जागा येऊनही कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. कारण राष्ट्रीय पातळीवरून या विषयी खमकेपणाने हालचाली करणारे नेतृत्वच अस्तित्वात नव्हते.

हे सारे होत असताना आणि मोदी सरकारकडून असंख्य गफलती आणि गैरकारभार होऊनसुद्धा त्याविरुद्ध कॉंग्रेसकडून पुरेसा जोरकस आवाज उठवला जात नव्हता. या दरम्यानच्या काळात राहुल गांधी हे केवळ ट्‌विटरवर मोदींची कोंडी करणारे प्रश्‍न सातत्याने उपस्थित करीत राहिले; पण त्यातून पक्ष उभारणीसाठी जी ताकद आणि संघटनेत आत्मविश्‍वास निर्माण होणे गरजेचे होते तो परिणाम साधला जात नव्हता. त्यामुळे पक्षाला पूर्ण वेळ आणि व्हिजीबल असा अध्यक्ष आता नेमला पाहिजे, ही मागणी या नेत्यांनी केली. ही मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसच्या पहिल्या फळीतील दमदार नेत्यांचा समावेश होता. त्यात गुलामनबी आझाद, शशी थरूर, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, अशी सारीच मातब्बर मंडळी होती. आजच्या घडीला असे पत्र सोनियांना पाठवण्याची गरजच काय होती, असा प्रश्‍न खुद्द राहुल गांधी यांच्याकडूनच उपस्थित केला गेल्याने या 23 मातब्बर नेत्यांची आजवरची सारी निष्ठाच धुळीला मिळाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. वास्तविक ही सारीच मंडळी कॉंग्रेसची खंबीर शिलेदार मंडळी आहेत. कॉंग्रेसचा भविष्यातील साराच डोलारा सांभाळण्याची ताकद असलेले हे नेते आहेत.

एका साध्या पत्राने या मंडळींच्या निष्ठेवर आता कायमचा डाग लागला गेला आहे. त्यातून निराश होऊन यातला एक जरी नेता पक्षाच्या बाहेर गेला तरी कॉंग्रेसचे ते एक मोठे नुकसान असेल. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर सोनियांनी स्वतःहून अध्यक्षपद सोडण्याचा जाहीर इरादा व्यक्‍त केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्या जागी आता त्वरित दुसरा अध्यक्ष नेमून हा विषय हाता वेगळा करावा आणि मोदींच्या विरोधातील लढाईला खंबीरपणे सामोरे जावे अशी सामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष पदात स्वारस्यच नसेल तर गांधी परिवाराने आता अजिबात वेळ न दवडता सहमतीने पक्षाध्यक्षपदासाठी एक नाव त्वरित निश्‍चित करून पक्ष सावरणे ही कॉंग्रेससाठी काळाची गरज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.