महाबळेश्‍वर आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ करणार : मुख्यमंत्री

कवठे – महाबळेश्‍वर हे माझे स्वत:चे अतिशय आवडते असे पर्यटनस्थळ आहे. राष्ट्रीय पातळीवर अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या या पर्यटनस्थळाला नजिकच्या काळात आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होण्यासाठी विशेष योजना राबवू. महाबळेश्‍वरच्या विकासासाठी कधीच काही कमी पडू न देता या शहराच्या प्रत्येक प्रश्‍नांत मी स्वत: लक्ष घालेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत महाबळेश्‍वरमधील विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अस्मिता पाटील, नगरसेवक कुमार शिंदे व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महाबळेश्‍वरमधील विविध विकासकामांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मदन भोसले यांनी मांडले. या प्रस्तावांची निकड व सविस्तर माहिती नगराध्यक्षा सौ. शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे, मुख्याधिकारी सौ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यामध्ये विशेषत: महाबळेश्‍वर ते लॅंडविक पॉंईट, क्षेत्र महाळेश्‍वर ते नाकिंदा आणि महाबळेश्‍वर ते क्षेत्र महाबळेश्‍वर या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करणे या कामांना मुख्यंमत्र्यांनी मंजुरी देत

कॉंक्रीटीकरणाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार असल्याचे सांगितले. महाबळेश्‍वरला “अ’ वर्ग पर्यटनस्थळ दर्जा मिळण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडे हा विषय मांडून मान्यता मिळवू असे सांगितले. वेण्णा लेक सुशोभिकरणाच्या आराखड्याबाबत समाधान व्यक्‍त करुन अशा कामांचा आपणा स्वत:ला अनुभव आहे, अशी पाच सहा कामे मी करुन घेतली आहेत. त्यामुळे या कामात आपण स्वत: लक्ष घालून हे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, या प्रश्‍नावर स्वतंत्र बैठक घेवू यासाठी तुम्ही या विषयाशी संबंधित सर्व तांत्रिक व्यक्‍ति, आर्किटेक्‍चर, अभियंत्यांना घेवून केव्हाही या, असेही निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महाबळेश्‍वर आपल्याला खूप चांगलं करायचं आहे, माझी स्वत:ची ती इच्छा आणि आग्रह आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मदन भोसले यांना सांगितले.

यावेळी भाजपा नेते अनिल जाधव, केतन भोसले, महाबळेश्‍वरच्या नगरसेविका सौ. श्रद्धा ढाणक, सौ. श्रद्धा रोकडे, कु. आफरीन वारुणकर, अभियंता भाडके, सचिन दीक्षित, किसन वीर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सतीश भोसले, ईशान भोसले, विनोद जाधव उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)