महाबळेश्वर (प्रतिनिधी) – महाबळेश्वर पालिकेच्या इमारत दुरुस्ती व सुशोभिकरणाच्या कामात अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले असून काही कामे निविदा न मागविताच केली जात आहेत. त्यामुळे पालिकेचे हे काम वादात अडकण्याची चिन्हे आहेत. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी या कामावर आक्षेप घेऊन ते तातडीने बंद करण्याची आणि यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राज्य व जिल्हा करोनाच्या संकटाचा सामना करत असताना महाबळेश्वर पालिकेच्या इमारतीची दुरुस्ती व सुशोभिकरण युद्धपातळीवर सुरू आहे. पालिकेची इमारत 30 वर्षांपूर्वीची असून स्ट्रक्चरर ऑडिट न करताच या कामावर साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. वास्तविक बाजारभावाचा विचार केला तरी या खर्चात नवी इमारत व फर्निचरदेखील तयार होईल. तडे गेल्याने जुनी इमारत कमकुवत झाली आहे. अशा स्थितीत त्यावर खर्च करणे, हा निव्वळ मूर्खपणा आहे.
या इमारतीवर आठ- नऊ वर्षांपूर्वी टाकलेले छप्पर आणखी दहा वर्षे टिकले असते. ते काढून नवीन छप्पर टाकण्यात येत आहे. या कामाचा ठराव करण्यात आला नसून अंदाजपत्रकही तयार नाही. या कामाची तांत्रिक मंजुरीही घेण्यात आलेली नाही. या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. हे काम तात्काळ थांबवण्याचे व त्याची चौकशी करण्याची मागणी बावळेकर व शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे
या कामावरून सत्ताधारी गटातही दोन गट पडले आहेत. काही नगरसेवकांनी या कामावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे रवींद्र कुंभारदरे यांनी याबाबत इतर नगरसेवकांना पत्र लिहिले आहे. नगराध्यक्षांचा मनमानी कारभार सुरू असून या इमारतीच्या दुरुस्तीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या कामात नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप होत आहे. आता बावळेकर यांच्या मागणीवर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.