Maha Vikas Aghadi Update महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख निवडणूकपूर्व आघाड्यांचे जागावाटप अद्यापही रखडले आहे. जवळपास ९० टक्के जागांवर आघाडी व युतीतील घटक पक्षांनी एकमत करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, मात्र उर्वरित जागांचा तिढा दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
अशातच, महाविकास आघाडीतील ८५-८५-८५ जागांच्या फॉर्म्युल्यात बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपाचा नवे सूत्र सांगताना याबाबत अधिकृत भाष्य केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि थोरात दिल्लीत दाखल झाले असून, दिल्लीदरबारी चर्चेनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने नव्या फॉर्म्युल्याचा स्वीकार केला आहे.
थोरातांनी नव्या फॉर्म्युल्याविषयी सांगितले की, आता काँग्रेस, ठाकरे शिवसेना, आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रत्येकी ९० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर १८ जागा मित्रपक्षांसाठी बाजूला ठेवल्या आहेत.
काँग्रेस १०० पार? | Maha Vikas Aghadi Update
महाविकास आघाडीचा उद्देश मैत्रीपूर्ण लढती टाळण्याचा असून, उमेदवार निवडताना योग्यतेवर भर देण्यात येत आहे. थोरात यांनी सांगितले की, राज्याच्या निवडणुकीत काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मित्रपक्षांसाठी राखीव ठेवलेल्या १८ जागांमध्येही आणखी बदल होण्याची शक्यता असून, काँग्रेसची संख्या १०० च्या पुढे जाऊ शकते का याची बेरीज अद्याप केली नसल्याचे थोरातांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे १५८ जागांवर उमेदवार जाहीर | Maha Vikas Aghadi Update
काँग्रेसने ४८ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने आतापर्यंत एकूण १५८ जागांवर उमेदवारांची नावे घोषित केली असून, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ६५ जागांचा समावेश आहे. उर्वरित जागांवर उमेदवारांची घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.