मुंबई – महाविकास आघाडीने परांडा, दक्षिण सोलापूर, दिग्रस आणि मिरज या चार ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केले आहेत. दिग्रस मध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसने मोहन वनखंडे यांना मैदानात उतरवले आहे. सोलापूर दक्षिण मध्ये उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अर्ज भरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या रणजीत पाटील यांच्या विरोधात राहुल मोटे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप –
उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवसानंतर महाविकास आगाडीचे जागावाटप समोर आले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक जागा हव्या होत्या. काँग्रेसने 104 जणांना अधिकृत पत्र एबी फाॅर्म दिले आहे. जागावाटपात काँग्रेसला 102 जागा सोडण्यात आल्या आहेत. ठाकर ेगटाची 100 जागा लढविण्याची मागणी असताना पक्षाने 96 जागांवर उमेदवार जाहीर उभे केले आहेत. तर शरद पवार गटासाठी 87 जागा सोडण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीने समाजवादी पार्टीला दोन, माकप, भाकपसाठी प्रत्येकी एक जागा सोडली आहे.
संजय राऊत – नाना पटोले यांच्यात वाद –
जागा वाटपाच्या चर्चेच्या दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यात वादावादी झाली होती. उबाठा गटाचे नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी परस्पर उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. काँग्रेसची मात्र या विषयावर पूर्ण नाराजी आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि गांधी परिवाराचे निकटवर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तसेच जागावाटपात संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या खटके उडाले त्याचा प्रत्यक्ष मतदानात एकमेकांच्या पक्षाचे नेते एकमेकांना सहकार्य करणार की नाही हा प्रश्न आहे. याचा काहीअंशी महाविकास आघाडीला काही जागावर फटका बसणार असल्याचेही बोलले जात आहे.
हरियाणाच्या निकालांचा परिणाम –
लोकसभा निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास संचारला होता. पण हरियाणाचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास काही अंशी कमी झाला. महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता असलेल्या अनेक मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवारांचे पेव फुटले असून हे अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते असल्याचे दिसून येत आहे.