महा ई सेवा केंद्र चालकाने 400हून अधिक शेतकऱ्यांना फसवले; शेतकरी संतप्त

लातूर – शेतकऱ्यांकडून पिक विमा भरताना जी रक्कम घेतली त्यापेक्षा कमी रक्कम विमा कंपनीत जमा करून लातूर जिल्ह्यातील चारशेहून अधिक शेतकऱ्यांची महा ई सेवा केंद्र चालकाने फसवणूक केली आहे. ही बाब समोर आल्यावर शेतकरी संतप्त झाले असून केंद्र चालकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ आणि बाकली येथील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी बिबराळ येथे सोय आहे. येथील महा ई सेवा केंद्रातून 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विम्याचा रक्कम भरली. भरलेल्या रकमेची पावती ही घेतली. मात्र, दोन महिन्याच्या कालावधीनंतर भरलेली रक्कम आणि ऑनलाईन दाखवत असलेली रक्कम यात बरीच तफावत दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त झाले आहेत. महा-ई-सेवा केंद्र चालकांनी पूर्ण विम्याची रक्कम न भरता आपली फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

भविष्यात पीक विमा मंजूर झाला तर होणाऱ्या लाभापासून चारशेहून अधिक शेतकरी वंचित राहतील अशी स्थिति निर्माण झाली आहे. यास सेवा केंद्र चालक जबाबदार असून त्याची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे. योग्य न्याय दिला नाहीतर सामूहिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर दोन्ही गावातील 100 शेतकऱ्यांची सही आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंगद सुडके यांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, राज्यात अनेक गावातील महा ई सेवा केंद्र हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच निर्माण केले गेले आहेत. मात्र, त्याच केंद्रातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर दाद कुठे मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.