टोकियो, दि 21- जपानच्या ईशान्येकडील समुद्रकिनारपट्टीला शनिवारी संध्याकाळी 7.2 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रामध्ये 60 किलोमीटर खोल होता. भूकंपामुळे मध्यम स्वरुपाच्या त्सुनामी लाटा उसळल्या होत्या. संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मियागी किनारपट्टीवर 1 मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा धडकल्या होत्या.
मात्र या त्सुनामी लाटांमुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपामुळे काही भागातील घरांची पडझड झाली. मियागी, कुरिहारा भागातील वीजपुरवठा खंडीत झाला. भूकंपामुळे टोहोकू शिन्कान्सेन बुलेट ट्रेन काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.
महिन्याभरापूर्वी फुकुशिमा जिल्ह्यात अशाच प्रकारे 7.3 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. 14 फेब्रुवारीला झालेल्या भूकंपात बऱ्याच मोठ्या भूभागाचा वीजपुरवठा खंडीत झाला होता.