बाजारात येता-येता दुप्पट महागतो भाजीपाला

बळीराजाला दर मिळेना, ग्राहकांचीही पिळवणूक

पिंपरी – एकीकडे ठोक बाजारात भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने मिळेल त्या भावात भाजी विकून बळीराजा उदास मनाने घरी परतत आहे. ठोक बाजारातून घाऊक बाजारात येईपर्यंत मात्र त्याच भाजीपाल्याचे दर दुप्पटीने महागतात. सर्वसामान्य ग्राहक उन्हाळा आला म्हणून भाज्या महागल्या असल्याचे समजत निमूटपणे महाग भाज्या विकत घेतो.

उन्हाळ्यात भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सर्वसामान्यांसाठी महाग असलेली भाजी शेतकऱ्यांसाठी मात्र आणखीही परवडणारी नसल्याचेच दिसत आहे. ठोक बाजारात भाजीचे दर भाजीमंडईतील भाजीच्या दरापेक्षा निम्मेच आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला विकल्यानंतर तो नागरिकांच्या हातात पडेपर्यंत दुप्पट दर होत असल्याने सर्वसामान्यांनाही महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने चाळीशी गाळली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

आवक घटल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईतही भाज्यांची आवक कमी झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. पिंपरी येथील भाजीमंडईमध्ये बटाटे 15 ते 20 रुपये किलो, कांदे 12 रु, टोमॅटो 20 ते 25, गवार 80 ते 90, दोडका 70, लसूण 80, आले 90 ते 100, भेंडी 60, वांगी 40, कोबी 40, फ्लॉवर 30, शेवगा 40, हिरवी मिरची 70 ते 90, शिमला मिरची 55, काकडी 40, गाजर 25, मटार 65 रुपये प्रति किलो असे दर आहेत.

किरकोळ बाजारात भाजीचे एवढे दर असले तरी घाऊक बाजारात मात्र याच भाज्याचे दर निम्म्यावर आहेत. त्यामुळे, बहुतांश नागरीक घाऊक बाजारात भाजी खरेदीला प्राधान्य देत आहेत. भाजी मंडई मध्ये जास्त किंमतीमध्ये भाजी खरेदी करण्यापेक्षा मोशी येथील उपबाजार समितीमध्ये घाऊक दरामध्ये शेतकऱ्यांकडील ताजा माल खरेदी करण्याला सर्वसामान्य नागरिक पसंदी देत आहेत. घाऊक बाजारातील भाज्यांचे दर (क्विंटलमध्ये) बटाटा 950, लसूण 2500, आले 5250, भेंडी 3000, गवार 4000, टोमॅटो 500, मटार 400, घेवडा 3500, दोडका 2500, मिरची 3500, काकडी 1150, गाजर 1250, फ्लॉवर 75, कोबी 750 रु क्विंटल मिळत आहे.

पालेभाज्या खरेदीही आवाक्‍याबाहेर

पालेभाज्यांची खरेदी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर होऊन बसली आहे. घाऊक बाजारात 8 रुपयाला जुडी मिळणारी कोथिंबीर आणि मेथी किरकोळ बाजारात 15 रुपयाला मिळत आहे. तसेच शेपूची जुडी घाऊक बाजारात 5 रुपयाला मिळते. तीच जुडी भाजी मंडईमध्ये 10 ते 15 रुपयाला मिळत आहे. पालकाचा दरही असाच असून किरकोळ बजारात 10 ते 15 रुपयाला जुडी मिळत आहे.

फळांची गोडीही महागतेय

किरकोळ बाजारात फळांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या पिंपरी भाजी मंडईमध्ये सफरचंद 160 रु, डाळिंब 80 रु, मौसंबी 60 ते 80 , किवी 100 (8 नग), द्राक्षे 50 ते 120 रु, आंबा (लालबाग) 100 ते 120, बदाम 100 ते 120, हापूस : 250 ते 350 रुपये किलोने मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.