मध्य प्रदेशात रिवा मध्ये हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रुग्णलयात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे महिलांना आपल्या आईचा मृतदेह खाटेद्वारे खांद्यावर घेऊन घरी जाण्याची वेळ आली आहे. या महिलांनी तब्बल 10 किमी असलेल्या आपल्या घरापर्यंत मृतदेह खाटेवर ठेवला आणि घरी आणला. रुग्णालयातून रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या महिलांवर ही वेळ आली. दरम्यान या घटनेचे व्हिडिओ समोर आला आहे.
हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलांना आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ #MP pic.twitter.com/kmkP5RiPnn
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) March 30, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, सामुदायिक आरोग्य केंद्र रायपूरमध्ये उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबातील महिलांनी मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. मात्र मृतदेह नेण्यासाठी त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. अशा स्थितीत या चार महिलांनी मृतदेह खाटेवर ठेवून घरी आणला. ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
मृतदेह खांद्यावर घेऊन रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांनी सांगितले की, त्यांच्या आईची प्रकृती खालावल्याने रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी खाटेवर रुग्णलयात आणण्यात आले. दरम्यान आरोग्य केंद्र रायपूर येथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेबाबत माहिती न दिल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन पुन्हा गावात आणावा लागला.
रिवाच्या रायपूर आरोग्य केंद्रात घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. मोलिया केवट, वय 80 असे या मृत महिलेचे नाव असून ती रेवा येथील मेहसुवा गावातील रहिवासी होती.