भोपाळ – मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील अकोडिया येथे एका आईने प्रेमात वेडे होऊन आपल्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर अवघ्या 48 तासांत खुनाचे गूढ उकलून पोलिसांनी या घटनेतील आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
3 मे रोजी अकोडिया पोलिसांना जाटपुरा येथे एका 12 वर्षीय मुलाचा (वरुण) मृतदेह घरात आढळून आला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
बदनामीच्या भीतीने खून –
वरुणची आई ममता हिचे उज्जैन येथे राहणाऱ्या संजय उर्फ सुदर्शन बामनियासोबत प्रेमसंबंध होते. प्रियकर अनेकदा वरुणच्या आईला भेटायला जायचा. घटनेच्या दिवशीही संजय वरुणच्या आईला भेटण्यासाठी घरी पोहोचला होता. यादिवशी वरूणचा वाढदिवस होता. त्यामुळे तो लवकर घरी आला. त्याने त्याच्या आईला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. ममताला वाटले की मुलगा वरूण ही माहिती त्याच्या वडिलांना आणि इतरांना सांगेल. कौटुंबिक जीवन बिघडवण्याबरोबरच बदनामी होईल, म्हणून ममताने प्रियकर संजयला मुलाला संपवण्यास सांगितले, त्यानंतर आई ममताने प्रियकराच्या मदतीने मुलाच्या चेहऱ्यावर उशी दाबून त्याला ठार केले.
शेजाऱ्यांमुळे माहिती उघडकीस –
पोलिसांनी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या लोकांशी बोलले असता त्यांनी पोलिसांना सांगितले की, उज्जैन येथे राहणारा संजय हा अनेकदा महिलेच्या घरी यायचा, घटनेच्या दिवशीही संजय वरुणच्या घरी आला होता, त्यानंतर पोलिसांनी थेट संजयला उज्जैन येथे गाठले. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, पोलिसांच्या चौकशीत संजयने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
घरी लवकर आल्याने गमवावा लागला जीव –
मृत वरुण आणि त्याची बहीण अंजली आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करतात. वरुणचे वडील कैलास सूर्यवंशी फळे विकण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही मुले दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वडिलांकडेच राहतात, मात्र घटनेच्या दिवशी वरुणचा वाढदिवस असल्याने घरी तयारी करण्यासाठी हातगाडीवरून दुपारी अडीच वाजता घरी आला, तेथे त्याने आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. आणि त्यानंतर त्याला जीव गमवावा लागला.
वरुणची हत्या केल्यानंतर आरोपी आई ममता ही घटना लपवण्यासाठी प्रियकराला पळवून लावल्यानंतर स्वतः शेतावर गेली, सायंकाळी वरुणची बहीण अंजली घरी पोहोचली तेव्हा तिने घराचे दरवाजे उघडले असता तिचा भाऊ बेशुद्ध पडलेला दिसला.
वरुण वाढदिवसानिमित्त खूप उत्साहित होता –
मृत वरुण हा आपल्या वाढदिवसानिमित्त खूप उत्साही होता, संध्याकाळी वडील आल्यानंतर घरी केक कापून वाढदिवस साजरा करणार होते, वाढदिवसाच्या तयारीसाठी तो 3 मे रोजी वडिलांचे काम सोडून घरी आला होता. मात्र आईने आपले कृत्य लपवण्यासाठी निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली.