विधानसभेत तातडीने शक्तिपरीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका
नवी दिल्ली -मध्यप्रदेश विधानसभेत तातडीने शक्तिपरीक्षा घेतली जावी, अशी मागणी करणारी याचिका माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दाखल केली आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारकडून उद्या (बुधवार) उत्तर मागवले आहे.
मध्यप्रदेशातील सत्तारूढ कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी बंड पुकारत राजीनामे दिले. त्यामुळे मुख्यमंत्री कमल नाथ यांचे सरकार अडचणीत आले आहे. त्यातून राज्यपाल लालजी टंडन यांनी सोमवारी शक्तिपरीक्षा घेण्याचा आदेश दिला. मात्र, विधानसभेचे सभापती एन.पी.प्रजापती यांनी करोनाच्या धोक्याचा हवाला देत सभागृहाचे कामकाज 26 मार्चपर्यंत तहकूब केले. त्यानंतर चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
कॉंग्रेस आमदारांच्या राजीनाम्यांमुळे मध्यप्रदेश सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला एक दिवसही सत्तेत राहण्याचा नैतिक, कायदेशीर किंवा घटनात्मक अधिकार नाही. त्यामुळे तातडीने शक्तिपरीक्षा घेण्याचा आदेश सभापती आणि मुख्यमंत्र्यांना दिला जावा, अशी मागणी चौहान यांनी याचिकेतून केली आहे. तिची दखल न्यायालयाने मंगळवारी घेतली. परिस्थितीची तातडी ध्यानात घेऊन न्यायालयाने सभापती, मुख्यमंत्र्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून उत्तर मागवण्यात आले असून उद्या त्यावर सुनावणी होईल.