भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी त्या राज्यातील सर्व करोनाविषयक निर्बंध हटवण्याची घोषणा केली. मध्यप्रदेशने करोना संकटामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवले असल्याचा दावाही त्यांनी केला.
चौहान यांच्या घोषणेमुळे मध्यप्रदेश गुरूवारपासून निर्बंधमुक्त होईल. त्यातून करोना संकट दाखल होण्याआधी असणारे सुरळीत जनजीवन त्या राज्यात अनुभवता येणार आहे.
निर्बंध हटल्याने सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने होऊ शकतील. मिरवणुकांना परवानगी देण्यात आली आहे. विवाह सभारंभ आणि अंत्यविधीसाठीच्या उपस्थितीवर कुठलीही मर्यादा नसेल.
शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने गजबजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रात्रीची संचारबंदीही आता नसेल. अर्थात, सरकारी कर्मचारी, दुकानदार, स्टॉलधारक, चित्रपटगृहांतील कर्मचाऱ्यांना पूर्ण लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. करोनालसींचे दोन्ही डोस 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांनाही आवश्यक ठरणार आहेत. चित्रपटगृहांतील प्रवेशासाठी प्रेक्षकांनी किमान एक डोस घेणे गरजेचे असेल.
निर्बंध हटवण्याची घोषणा करताना चौहान यांनी जनतेला करोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे. लसींचे डोस घ्यावेत, असे त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले. मध्यप्रदेशात बुधवारी केवळ 5 नवे करोनाबाधित आढळले. त्या राज्यात सध्या अवघे 78 सक्रिय बाधित आहेत. मध्यप्रदेशातील 91 टक्के प्रौढांना करोनालसींचा पहिला डोस मिळाला आहे. त्या राज्यातील 47 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.