ग्वाल्हेर – हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत असताना अपघात झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील महाराजा बाडा येथील महानगरपालिका कार्यालयात झेंडा लावताना घडली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंजर आलम, कुलदीप दंडैतिया आणि विनोद अशी मृत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
स्वातंत्र्यदिनाची तयारी देशभरात सुरू आहे. दरम्यान महाराजा बाडा येथील महानगरपालिका कार्यालयातही ध्वजारोहणाची तयारी केली जात होती. त्यासाठी शनिवारी सकाळी अग्निशमन दलाचे हायड्रोलिक मशीन मागवण्यात आले. इमारतीवर झेंडा लावण्यासाठी काही कामगार या हायड्रोलिक मशीनवर चढले. या दरम्यान अचानक हायड्रॉलिक मशीन तुटले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.