पुणे, – विधानसभा निवडणुकीच्या पर्वती मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत. मिसाळ यांनी महाविकास आघाडी – राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांचा ५४ हजार ६६० मतांनी पराभव करत पर्वती मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित केले आहे. मिसाळ यांनी सलग विजयाचा “चौकार’ मारल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पर्वती मतदारसंघात यंदा भाजप-महायुतीच्या माधुरी मिसाळ, महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम आणि अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्यात ही लढत झाली. मात्र, थेट शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत मिसाळ यांनी मताधिक्य मिळवित विजयाची परंपरा कायम ठेवली आहे.
पर्वतीमध्ये एकूण १६ उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरले होते. त्यात मिसाळ यांना १ लाख १८ हजार १९३, अश्विनी नितीन कदम यांना ६३ हजार ५३३ मते, अपक्ष उमदेवार आबा बागुल यांना १० हजार ४७६ मते, संभाजी ब्रिगेड पक्षाचे अविनाश घोडके १ हजार ९५३ मते, वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा गायकवाड यांना ३ हजार ४२० मते आणि २ हजार ४६१ मतदारांनी “नोटा’चा पर्याय निवडला.
मतदार राजा ज्याच्यावर विश्वास टाकतो, त्याला तो निवडून आणतो. त्यामुळे झालेला विजय हा नुसता विजय नाही तर षटकारच म्हणावे लागेल. विरोधकांना त्यांच्या स्वत:च्या प्रभागात देखील अपेक्षित मते मिळाली नाहीत. मतदारांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे सर्वांचे मन:पूर्वक आभार.
– माधुरी मिसाळ, विजयी उमेदवार