माढा लोकसभेसाठी पहिल्या दिवशी 75 उमेदवारी अर्ज विक्री

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून यासाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची जोरदार तयारी केली असून अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे हे उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशी 38 उमेदवारांनी एकूण 75 अर्ज नेले.

माढा लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह 6 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व सुमारे 15 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

दाखल अर्जांची छाननी 5 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. 21 एप्रिलला प्रचाराचा समारोप, तर 23 एप्रिलला मतदान होणार आहे. याची मतमोजणी 23 मे रोजी करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.