माढा : भाजप-राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत

माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला तिढा आता सुटला असून भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाईक-निंबाळकर कॉंग्रेसमधून भाजपत आले आहेत. ते सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. आता माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि नाईक-निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले. नंतर ते माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा झाली. पण नंतर तेथून संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. संजय शिंदे खरे तर भाजपचे नेते. वास्तविक पाहता गेल्या चार वर्षांपासून संजय शिंदे यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली होती. पण संजय शिंदे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची पंचाईत झाली आणि उमेदवारी कुणाला द्यायची याचा घोळच सुरू झाला. रोज एका नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत यायचे आणि हवेत विरूनही जायचे. त्यामुळे माढ्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ होते.

निवडणूक जाहीर झाल्यावर प्रथम सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. तसे पाहिले तर देशमुख यांनी मागे शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवलीही होती. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होणे स्वाभाविक होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपत आले. मग माढ्यातून त्यांना उमेदवारी मिळणार म्हणून चर्चा सुरू झाली. त्यांना निश्‍चितपणे उमेदवारी मिळणार असेच सगळे अगदी राजकीय विचारवंतही म्हणत होते. पण त्यांची उमेदवारीही जाहीर झाली नाही. सहकारमंत्री देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. अलीकडेच सातारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित नाईक-निंबाळकर यांनी भाजपत प्रवेश केला तेव्हा त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. त्याप्रमाणे आता नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी भाजपकडून जाहीर झाली आहे. त्यामुळे आता माढ्यातील लढत रंगतदार होईल.

2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. पुनर्रचनेनंतर या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपचे सुभाष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. पवार यांनी देशमुखांचा 3 लाख मतांनी पराभव केला होता.

2014मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी भाजपने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. तेथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आणि निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशात मोदी लाट असूनही माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. पण ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती. खोत यांचा 25 हजार मतांनी पराभव झाला होता.

माढा मतदारसंघावर कॉंग्रेसच्या विचारांचा पगडा आहे. याला साखरपट्टा म्हणून ओळखले जाते. कारण या मतदारसंघात साखर कारखाने जास्त आहेत. हा भाग दुष्काळीही आहे. माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत विभागला गेला आहे. यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यातील चार सोलापूर जिल्ह्यात तर दोन सातारा जिल्ह्यात आहेत. करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला हे विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात तर फलटण आणि माण हे मतदारसंघ सातारा जिल्ह्यात आहेत. या विधानसभा मतदारसंघांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. तर करमाळ्यात शिवसेनेचे आमदार आहेत. या मतदारसंघात 16 लाखाहून अधिक मतदार आहेत.

2009मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्यासारखा प्रभावी नेता विजयी होऊनही या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. माण, सांगोला हे दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहेत आणि इथे पाणीटंचाईची समस्या तीव्र आहे. साखर कारखाने असले तरी ते आर्थिक अडचणीत आहेत. इतर कृषी उद्योग वा अन्य उद्योग इथे नाहीत. एकूणच माढा लोकसभा मतदारसंघातील समस्यांचे आव्हान विजयी नेत्याला पेलावे लागणार आहे. विजयसिंह मोहिते-पाटील हे या मतदारसंघातील सध्याचे खासदार आहेत. त्यांच्या अनेक सहकारी संस्थाही अडचणीत आहेत.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा भाजप प्रवेश हा कॉंग्रेससाठी मोठा हादरा मानला जात आहे. नाईक निंबाळकर यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वीच सातारा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे हे अतिशय मुरब्बी आणि डावपेच खेळण्यात कुशल आहेत. ते भाजपतून राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांच्या या निर्णयाने भाजपतील नेत्यांना धक्का बसला आहे. त्यांचे मोहिते-पाटील यांच्याशी अजिबात सख्ख्य नाही. उलट वैरत्वच आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, विजयराज डोंगर अशा समविचारी मंडळींचे समर्थन घेऊन यशस्वीही झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचा दबदबा असतानाही निवडून येण्याची किमया त्यांनी केली होती. माढा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांच्या गटातटाच्या राजकारणाचा शिंदे यांनी स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी उपयोग करून घेतला. शिंदे यांना खरे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढ्यातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला होता. पण त्यांनी ही संधी सोडत राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात येण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपत त्यांच्याविषयी नाराजी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.