मंचर- घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीने नागरिकांना सॅनिटायजरचे वाटप केले आहे.तसेच येथील परिसरात धुराळणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आल्याची माहिती घोडेगावच्या सरपंच क्रांती प्रशांत गाढवे यांनी दिली. घोडेगाव येथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात.घोडेगाव जवळील असणाऱ्या जुन्नर परिसरात करोना रुग्ण आढळल्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या चौकाचौकांत हात धुण्यासाठी सॅनिटायजर ठेवण्यात आले असून, परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त असून मोकाट फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस बांधवांच्या मदतीसाठी घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, सेवाभावी कार्यकर्ते धनंजय कोकणे यांच्या सहकार्याने काम करत आहे. रोज भाजीपाला बाजारपेठेत भरत आहे; परंतु गर्दी टाळण्यासाठी भाजीबाजार हा जनता विद्यामंदिर व शाळेच्या मैदानावर भरवण्याचा निर्णय पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या संमतीने घेण्यात आला.
गाव आणि वाडीवस्तीवर औषध फवारणीसाठी विघ्नहर सहकारी कारखान्याच्या वतीने टॅंकर व मशीन संचालक यशराज काळे यांनी उपलब्ध करुन दिली. अजित काळे, सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, सदस्य सुनील इंदोरे,ग्रामविकास अधिकारी जनार्दन नाईकडे यांसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी जातीने लक्ष घालून समन्वयाने काम केले आहे. पोलीस ठाण्याचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस मित्र, रेस्क्यू टीम यांना सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले आहे.