“माण’ने पटकाविला सुंदर गाव पुरस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव

हिंजवडी – पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार या वर्षी माण ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील अल्पबचत भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गावात केलेली नियोजनबद्ध विकासकामे, गावातील स्वच्छता या गोष्टींत सातत्य राखल्याने यावर्षीचा सुंदर गाव (स्मार्ट व्हिलेज) पुरस्कार माण गावाला प्राप्त झाला असल्याचे ग्रामविकास अधिकारी बी. आर. पाटील यांनी सांगितले. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने जिल्हा परिषदेच्या वतीने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

माणचे माजी सरपंच राजेंद्र भोसले, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच प्रदीप पारखी, ग्रामविकास अधिकारी भरत पाटील यांनी हा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारला.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद, सचिन आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत हा पुरस्कार सोहळा झाला. पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. यामध्ये पिरंगुट, भूगाव ग्रामपंचायतींचा देखील समावेश होता. माण ग्रामपंचायतीला यापूर्वी राज्य व केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गावाला पुरस्कार मिळाल्याने माणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उल्लेखनिय कामगिरीमुळे मिळाला पुरस्कार
तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी गावस्तरावर राबविलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, वृक्षारोपण, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, मलकापूर पाणी योजना अशा विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय कामागिरीमुळे सन 2020-2021 साठीचा सुंदर गाव पुरस्कार माण गावाला मिळाला असल्याचे मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.