स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता : भंगार साहित्यापोटी मिळणार 82 लाख
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे ही इमारत पाडण्यात येणार आहे. ही इमारत पाडणाऱ्या ठेकेदाराला इमारतीतून प्राप्त होणारे लोखंड, पत्रे, लाकुड, विद्युत वायरिंग असे विविध प्रकारचे साहित्य देण्यात येणार आहे. त्यापोटी ठेकेदाराकडून महापालिकेला सुमारे 82 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
नेहरूनगर येथे 28 एकर जागेत अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल उभारण्यात आले होते. कामगार कल्याण मंडळाने हे संकुल उभारून महापालिकेकडे हस्तांतरित केलेले आहे. पाच हजार आसन क्षमता असलेल्या या क्रीडा संकुलाची इमारत 44 वर्षे जुनी झाली आहे. या मैदानावर विविध शालेय, व्यावसायिक स्पर्धा झाल्या आहेत. त्यातून कोट्यवधी रूपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीतून क्रीडा संकुलाची देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संकुलाची दुरावस्था झाली आहे.
या क्रीडा संकुलात सध्या क्रीडा ग्रंथालय, निवडणूक विभाग कार्यालय, मैदान बुकींग कार्यालय आहे. मोडकळीस आलेल्या या इमारतीमुळे या कार्यालयांनाही धोका निर्माण झाला आहे. महापालिका अतिक्रमण विभागाने विविध कारवाईत जप्त केलेले साहित्य या संकु लाच्या प्रवेशद्वारातच अस्ताव्यस्त टाकलेले आहे. बांधकामाची अवस्था दयनीय झाली आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत. सुरक्षेसाठी उभारलेले लोखंडी कठडे कमकुवत झाले आहेत. छतावरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत.
स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. या संकुलात क्रीडाविषयक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव वगळता ही इमारत संपूर्णपणे पाडण्यात येणार आहे. त्यानंतर ‘पीपीपी’ तत्वावर पुन्हा नवीन अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ही इमारत पाडणाऱ्या ठेकेदाराला इमारतीतून प्राप्त होणारा राडारोडा, स्ट्रक्चरल स्टील, लोखंड, दरवाजा, खिडक्या, कॉंक्रीट, वीटा, फरशी, लोखंडी ग्रील, पत्रे, लाकुड, विद्युत वायरींग, बटणे आणि इतर न काढता येणारे साहित्य देण्यात येणार आहे. त्याचा मोबदला म्हणून ठेकेदाराकडून रक्कम घेण्यात येणार आहे. त्यानुसार, क्रीडा संकुलाची इमारत पाडण्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. एकूण दहा ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी ए टु झेड स्क्रॅपस या ठेकेदाराने सर्व करासंहित सर्वाधिक म्हणजे 81 लाख 92 हजार रुपयांची रक्कम महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे.