चैन्नई – कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल-२०२१ स्पर्धेचे जेतेपदक पटकावले. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील चैन्नई संघाचे हे चौथे जेतेपद ठरले. विशेष म्हणजे CSK संघाने ही चारही जेतेपदं महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकली आहेत.
आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा भारतात व दुसरा टप्पा युएई येथे खेळवण्यात आला होता. १५ ऑक्टोबरला या स्पर्धेचा अंतिम सामना चैन्नई व कोलकाता संघादरम्यान खेळवण्यात आला होता. या सामन्यात चैन्नईने कोलकता संघाला २७ धावांनी पराभूत करत आयपीएल स्पर्धा जिंकली होती.
चैन्नई सुपर किंग्सच्या या विजयाचे सेलिब्रेशन आज चैन्नई येथील कलाईवनार अरंगम सभागृहात झाले. या कार्यक्रमाला तामिळ नाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी, बीसीसीआय सचिव जय शाह, दिग्गज क्रिकेटर कपिल देव यांची उपस्थिती लाभली होती.
दरम्यान, चैन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल स्पर्धा विजयाच्या सेलिब्रेशन सोहळ्यात कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मोठं वक्तव्य केलं. “मी नेहमीच माझ्या क्रिकेट कारकिर्दीचे नियोजन केले आहे. मी खेळलेला शेवटचा सामना रांची येथे खेळलेलो. माझ्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा सामना माझ्या घरच्या रांची येथील मैदानावर खेळलो. आता माझी अशी इच्छा आहे की, मी माझ्या कारकिर्दीतला शेवटचा टी२० सामना चैन्नई येथे खेळावा. हे पुढील वर्षी होईल की आणखी पाच वर्षांनी होईल हे आताच सांगता येणार नाही.” असं धोनी म्हणाला.