एम.एच. अकरा, हॉर्नचा होणार “बकरा’

नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांचे व्हिजन : वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील

स्वागतासाठी सातारकरांची गर्दी

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत हे यापूर्वी साताऱ्यात तीन वर्षे कार्यरत होते. शिस्तबद्ध अधिकारी आणि दिलखुलास व्यक्‍तिमत्वाच्या जोरावर राऊत यांनी जिल्हावासियांची मने जिंकली होती. “नो हॉर्न प्लीज’ मोहीम राबविताना त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेतले. त्याचबरोबर राऊत हे उत्तम क्रिकेटर देखील असून यापूर्वी राऊत यांनी पुढाकार घेऊन व तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सहकार्याने पत्रकार आणि अधिकारी यांच्यात क्रिकेट सामन्याचे आयोजन देखील केले होते. राऊत आता पुन्हा एकदा साताऱ्यात रूजू झाले असून त्यांचे स्वागत करण्यासाठी डॉक्‍टर, इंजिनिअर, विद्यार्थी यांची दालनात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यावेळी स्वागत स्वीकारताना “नो हॉर्न प्लीज’ मोहीम पुढे न्यायची आहे, असा शब्द राऊत प्रत्येकाकडून घेताना देखील दिसून येत आहेत.

सातारा – हॉर्नच्या आवाजाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम “नो हॉर्न प्लीज’ मोहीम राबविणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत पुन्हा एकदा साताऱ्यात रूजू झाले आहेत. येत्या काही दिवसात “नो हॉर्न प्लीज’ मोहीम पुढे नेण्यासाठी विद्यालयांमध्ये एमएच अकरा, हॉर्नचा होणार बकरा, या घोषवाक्‍याद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणार असल्याचा मानस राऊत यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ट्रक व एसटी बसेसच्या माध्यमातून होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी देखील पाऊले उचलणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दै. प्रभातच्या प्रतिनिधींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्याशी नुकताच संवाद साधला. त्यावेळी राऊत यांनी यापूर्वी साताऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी राऊत म्हणाले, “नो हॉर्न प्लिज’ मोहीम सर्वांनी मिळून पुढे नेणे आवश्‍यक आहे. हॉर्न असो वा इतर कोणत्या उपकरणांमधील आवाज समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम करित असतात. हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे आज पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. एवढेच नव्हे तर हॉर्नच्या आवाजाचा परिणाम गर्भवती माताच्या पोटातील बाळावर देखील होत असतो. फ्रान्स सारख्या प्रगत देशात हॉर्न बंदी असताना देखील काही प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

ह्यावरून प्रगत देश ध्वनी प्रदूषणाबाबत किती जागरूक आहेत, हे दिसून येते. त्या पार्श्‍वभूमीवर भारतातील वाहनचालकांनी देखील ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूक होण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच यापूर्वी आणि आता यापुढे सातारा विभागात नो हॉर्न प्लिज मोहीम गतीने राबविण्यात येईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रबोधन हा सर्वोत्तम मार्ग असून त्यासाठी प्राधान्याने विभागातील महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, ध्वनी प्रदूषण रोखण्याबरोबर एसटी बसेस आणि ट्रक अशा वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याची बाब प्रतिनिधींनी राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर राऊत यांनी लवकरच एसटी महामंडळाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे सांगितले. त्याचबरोबर बुलेट सारख्या वाहनांचे सायलेन्सर बदलून होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबतही लवकरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असेही राऊत यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.