त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था; ग्रॅन्ड प्रेसिडेन्शियल सूट स्वागताला सज्ज
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरबराईसाठी “आयटीसी मौर्य’ हॉटेलमध्ये फूड टेस्टींग लॅबोरेटरी, सुसज्ज सुरक्षा व्यवस्था, ड्रॉईंग रूम, स्पा आणि फ्लोअर बटलरसह सर्व लक्झरी सुविधांनी सुसज्ज खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. “आयटीसी-मौर्य’ हॉटेलमध्ये यापूर्वीही काही राष्ट्रप्रमुखांच्या मुक्कामाची बडदास्त ठेवण्यात आली होती. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाहुणचारासाठी आयटीसी-मौर्यमधील ग्रॅन्ड प्रेसिडेन्शियल सूटची व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
“आयटीसी-मौर्य’मध्ये हवेच्या गुणवत्तेवर देखरेख करणारी प्रणालीही असून पाहुण्यांना थंडगार नैसर्गिक आल्हाददायक हवेचा आनंद यामुळे घेता येऊ शकेल. चाणक्य नावाच्या दोन बेडरूमच्या ग्रॅन्ड प्रेसिडेन्शियल सूटमध्ये यापूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जीम कॅरी, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्लू बुश यांनी मुक्काम केला होता. यामध्ये खाजगी प्रवेशद्वारासह खासगी ड्रॉईंग रूम, एक खाजगी टेरेस, एक व्यायामशाळा आणि जेवणासाठी स्वतंत्र क्षेत्र आहे. याशिवाय खासगी प्रवेशद्वार, एक पार्किंग बुलेव्हार्ड, एक हाय स्पीड लिफ्ट, विस्तृत सुरक्षा प्रणाली आणि अध्यक्षीय बटलरची व्यवस्था आहे.
याशिवाय स्वागत कक्ष, विश्रांती कक्ष, अभ्यासिका, मोरांच्या संकल्पचित्राने नटलेला 12 आसनी खासगी भोजनकक्ष, अद्ययावत बाथरूम आणि अंतर्गत सजावटीने नटलेले मिनी स्पा आणि जिम्नॅशियमही आहे. या सूटमध्ये 55 इंची एचडी टिव्ही, आयपॉड स्टेशन आणि बिजनेस कोर्टयार्डसाठीचा संपर्काची सोयही आहे. संपूर्ण गोपनीय वातावरणातील समिट लॉंज आणि बोर्डरूमचीही व्यवस्था असल्याने येथे चर्चा आणि विचारविमर्शही केला जाऊ शकतो. 2015 मध्ये बराक ओबामा यांनीही याच सूटमध्ये मुक्काम केला होता.
ट्रम्प यांच्या भेटीच्यावेळी या पंचतारांकित हॉटेलवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल. चाणक्यपुरीमध्ये 438 खोल्या असून प्रत्येक मजल्यावर साध्या पोषाखातील पोलीस तैनात असतील. ट्रम्प यांच्यासमवेत अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, राष्ट्राध्यक्षांची कन्या इवांका आणि जावई जेरेड कुशनर हे देखील येणार आहेत. ट्रम्प यांच्या शिष्टमंडळामध्ये अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन मुनचिन आणि वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांचाही समावेश असेल. ट्रम्प अहमदाबादमध्ये 24 फेब्रुवारी रोजी येणार आहेत. अहमदाबादेतून ते आग्रा इथे ताजमहालला भेट देतील. त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.