सातारा पालिकेत लंच टाइम दोन तासांचा

मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी कर्मचारी बेताल

सातारा  – सातारा पालिकेच्या कारभाराचा पंचनामा वेळोवेळी होऊनही प्रशासनातल्या कोडग्या अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीत काडीमात्र फरक पडलेला नाही. पालिकेत दुपारच्या जेवणाची वेळ दोन तासांपर्यंत लांबवण्यात आल्याने जनताजनार्दनाच्या कामांचा सातत्याने खोळंबा होत आहे. सवडीप्रमाणे काम आणि सवडीप्रमाणे जेवणाची सुट्टी यामुळे कामांचा जलद निपटारा होईनासा झाला आहे.

पालिकेत सातारा विकास आघाडीच्या साडेतीन वर्षांच्या काळात सातारकरांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. पाणीटंचाईची तक्रार असो की, घरपट्टी अथवा दाखल्यांसाठी पालिकेत जाणे असो, हेलपाटे मारून नागरिक घाईला येतात. त्यातच कर्मचारी दुपारी 1 नंतर जेवणाच्या सुट्टीसाठी गायब होतात, ते 4 नंतरच प्रकटतात. शहर विकास, स्थावर जिंदगी, आस्थापना, वसुली या महत्त्वाच्या विभागांमध्ये दुपारी 1 ते 4 यावेळेत सन्नाटा असतो. लेखा विभागाला तर या दोन तासात चक्‍क कुलूप लागलेले असते.

कामाच्या या विचित्र प्रथा पडल्याने आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा धाक नसल्याने पालिकेची अवस्था धर्मशाळेसारखी झाली आहे. कर्मचारी कुठे आहेत, असे विचारल्यावर भागात गेलेत, इंजिनियर कुठे गेलेत, तर साईटवर गेलेत, अशा लोणकढी थापा मारल्या जातात. त्यांना सातारकर सरावले आहेत. दुपारच्या जेवणाची वेळ 1.30 ते 2 अशी निर्धारीत करण्यात आली आहे. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी तसा आदेश बजावून कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत येण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु परिस्थितीत फरक पडलेला नाही.

पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना तर काहीच फरक पडत नाही. प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, हे जणू आपल्या अख्त्यारीत येत नाही, अशी त्यांची कार्यशैली आहे. साडेतीन वर्षांची मुदत पूर्ण होत आल्याने साहेब निघायच्या तयारीत आहेत. प्रशासनात माजलेल्या अनागोंदीवर पदाधिकाऱ्यांचेही नियंत्रण नाही.

स्वतः नगराध्यक्षांच्या बैठका अथवा प्रशासकीय कामे पुढे ढकलण्याची नामुष्की अनेकदा ओढवल्याचे सांगितले जाते. मात्र, कारवाई कोणी करायची आणि विचारायचे कोणाला, हा वादाचा मुद्दा आहे.नगराध्यक्ष माधवी कदम यांनी दोन वेळा “सरप्राईज व्हिजिटत करून गैरहजर कर्मचाऱ्यांची यादी मुख्याधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, गोरेसाहेबांनी ती यादी सोयीस्कर बाजूला ठेवल्याने कर्मचाऱ्यांना जे समजायचे ते समजले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा लंच टाइम अर्धा तासाचा असावा यासाठी सातारकरांवर आंदोलनाची वेळ आली आहे.

विभागप्रमुखांच्या आगामी बैठकीत या विषयावर कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कामाच्या वेळेत गैरहजर असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.

– शंकर गोरे, मुख्याधिकारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.